*सहकाराची वाट कुणी लावली..???*
सहकाराचा उद्देश:
*उत्पादित केलेला नाशवंत मालावर जर चांगल्या प्रकारे प्रक्रिया करता आली आणि त्याचे व्यवस्थित मार्केटिंग केले तरच शेतकऱ्यांचा विकास होईल।।*
हे लक्षात घेऊन सन 1970 -80 च्या नंतर प्रक्रिया उद्योगाचे वारे वाहू लागले होते..!
परंतु शेतमाल प्रक्रिया उद्योगात एवढी मोठी गुंतवणूक कोण करणार …?
आणि कुणी खाजगी उद्योगपतींनी केलीच गुंतवणूक तर खाजगी उद्योग क्षेत्रातुन शेतकऱ्यांची पिळवणूक होऊ शकते… पडत्या भावाला शेतमाल खरेदी केला जाऊ शकतो…!
जशी पिळवणून इंग्रजांच्या काळात कंपनी सरकार कडून निळी उत्पादक शेतकरी – कापूस उत्पादक शेतकऱ्यांची होत होती..! .. तशीच पिळवणूक भांडवलदारांकडून शेतकऱ्यांची होऊ शकते..!!
मग यातुनच तोडगा काढत सहकार क्षेत्राचा जन्म झाला आपल्याकडे…!
सहकाराचे कामकाज:
*सरकारच्या मध्यस्थीने अनेक शेतकऱ्यांनी एकत्र येऊन, शेअर स्वरूपात थोडे थोडे भांडवल गुंतवणूक करून उभे राहिलेले उद्योग ते सहकारी उद्योग होय*
त्यातूनच सहकारी तत्वावर साखर कारखाने व दूध संघ उभा राहिले ।। पतसंस्था उभा राहिल्या।।
केंद्र – राज्य सरकार कडून अनेक रूपाने याला साहाय्य देण्यात आले।।
यात मालक आणि चालक शेतकरीच असल्याने शेतकऱ्यांना हितकर असे सर्व निर्णय शेतकऱ्यांनाच घ्यायचे असतात.
याचे काम पाहण्यासाठी शेतकऱ्यांमधूनच प्रतिनिधी निवडून दिले जायचे …तेच पाच वर्ष कारभार पहायचे।। स्थानिक लोकांना प्रशिक्षित करून मोठ्या प्रमाणात रोजगारही यातून उपलब्ध झाला।।
एका दशकात शेतकऱ्यांचा दारी भरभराटी आली।। त्यातल्या त्यात पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांनी विशेष फायदा करून घेतला या सहकाराचा …!! थोडक्या कालावधीत शेतकरी सधन झाला…!
सहकारा बद्दल निर्माण झालेल्या अविश्वासहर्यातेची कारणे:
पुढे “शेतकऱ्याच्या हितासाठी सहकार” हा उद्देश मागे पडून सहकारी संस्थेचे – उद्योगाचे कामकाज पाहणे हे गावपातळीवरची मोठी प्रतिष्ठा होऊन बसले…!
त्यामुळे सहकारातून आलेल्या सधनतेमुळे आलेला सुखाचा घास खुप दिवस आनंदाने चाखता आला नाही आम्हा शेतकऱ्यांना…!!
जर पाच वर्षाला येणारी निवडणूक प्रतिष्ठेची होऊन बसली….
ती लढवण्यासाठी आणि जिंकून येण्यासाठी भरपूर ताकत लावली जाऊ लागली…!
स्थानिक आमदार – खासदार यांनी आपली ताकत वाढवण्यासाठी या सहकारी उद्योग संस्थांच्या निवडणूकामध्ये आपले पॅनल उभे करायला चालू केलं…
पक्ष – नेते – गट – तट निर्माण होऊ लागले… एकोप्याने नांदणारी गावे आपापसात भांडू लागली….
निवडून येण्यासाठी प्रचारात पैसे उधले जाऊ लागले…! निवडणूकांमध्ये राडे केले जाऊ लागले….
पुढे शेतकऱ्यांनी सहकारी संस्थेच्या हितासाठी निवडून दिलेला त्यांच्यातलाच प्रतिनिधी, निवडून आल्यानंतर मात्र आपण आपल्या शेतकऱ्यांच्या हितासाठी संस्था – कारखाना चालवला पाहिजे हे विसरून जाऊ लागला.
हळूहळू सहकारी संस्थेचे उद्दिष्ठ असलेले *शेतकऱ्यांचे हित* ही गोष्ट बाजूला जाऊन ती *राजकारणा मधील प्रतिष्ठा बनली*।।
सर्वात वाईट गोष्ट म्हणजे, प्रतिनिधी निवडून देणाऱ्या आपण शेतकऱ्यांना देखील राजकारणच ज्यास्त भारी वाटले।।
Rx 100 च्या पुंगळ्या काढून, गुलाल लावून फिरवायला अन कार्यकर्ता म्हणून मिरवायला, विरोधी उमेदवारांच्या दारावर जंगी मिरवणूक काढायला , फटाके फोडायला आपल्या शेतकऱ्यांना भारी वाटले।।
मग सकाळी लौकर उठून दिवसभर रानात काम करू रात्री लौकर झोपणारा आमचा शेतकरी वर्ग दुध घालायच्या बहाण्याने सकाळ – संध्याकाळी दुधाचं कॅन्ड घेऊन दररोज गावात जाऊ लागला …. सकाळी 3 तास अन संध्याकाळी 3 तास गावातल्या टपरी हॉटेलवर च्या (चहा) पेत राजकारणाच्या गप्पा रंगवायला लागला।।
कारखाना किंवा सहकारी संस्था चालवण्यास लायक माणूस बघण्यापेक्ष्या विशिष्ठ पक्षाचा – नेत्यांचा, जाती पातीचा माणूस निवडून आणण्यासाठी लोक मतदान करू लागले…!
पुढे हेच सहकारी उद्योग राजकारणी लोकांना निवडणूकीसाठी लागणारा पैसा देणारी दुभती गाय बनले।।
सहकारी उद्योगांतून मिळणारा नफा हा त्या उद्योगाच्या सभासद शेतकऱ्यांना द्यावा लागत असे ।। त्याचा हिशोब दाखवावा लागत असे।।।
म्हणून निवडून दिलेल्या कारभारी मंडळीकडून कारखान्याचा नियमित खर्च वाढवुन दाखवला जाऊ लागला आणि फायद्यातले सहकारी उद्योग तोट्यात दाखवले जाऊ लागले।।
कारखान्याचा प्रशासक / एम डी आदी आधिकाऱ्यांना जवळ धरून साम – दाम नीती वापरून अनेक गफळे केले जाऊ लागले.
आपल्यातल्याच चार टुकार कारट्यांना खाऊ – पिऊ घालून चालक मंडळींनी अरेरावी – गुंडागर्दी चालू केली..!
ऊसाच्या वजनात काटा मारून चोरट्या पद्धतीने केलेल्या भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे बाहेर येऊ लागली।।
याबद्दल निवडून दिलेल्या चेअरमन – संचालक मंडळींना जाब विचारायाच सोडून सभासद – शेअरधारक असलेला शेतकरी षंढ होऊन बसला…!
सहकार क्षेत्राचा “शेतकऱ्यांच्या हितासाठी सहकार” हा मुख्य उद्देश आता पूर्णतः मागे पडला होता ।।
कारभाऱ्यांचा वाढता भ्रष्टाचारामुळे कारखाने – सहकारी संस्था मोठ्या प्रमाणात तोट्यात येऊ लागल्या…
त्याचा परिणाम म्हणून, शेतकऱ्यांच्या मालाला फार कमी दर दिला जाऊ लागला…
FRP साठी (निश्चित दर देण्यासाठी ) राज्य सरकारला मध्यस्थी करण्याची वेळ आली।।
आपणच सभासद असलेल्या आपल्याच मालकीच्या कारखान्यात उसाला, दुधाला योग्य दर द्यावा म्हणून आंदोलने – मोर्चे काढायची बिकट वेळ शेतकऱ्यांवर आली।।
अशा कारणांनी हळूहळू *सहकार* या क्षेत्राला गालबोट लागत गेले।।। त्याचाच *परिणाम म्हणून आज आपण शेतकरी हे भोगतोय..! *
नवा तरुण शेती सोडून बाकीच्या उद्योगाकडे पळतोय… शेतकऱ्याला पोरगी द्यायला पोरीचा बाप नाय म्हणतोय…!
आणि
“राजकारण्यांनी कारखान्याची वाट लावली” म्हणून आपण शेतकरी बोंबा मारतोय…!
पण यात मला राज्यकर्त्यांची चूक नाही वाटत।। चुक वाटते आपलीच… आम्हा शेतकऱ्यांची ।।
शेतकरी सतर्क राहिला नाही, *शेतकऱ्यांच्या हितासाठी सहकार* हा उद्देश स्वतःच आधी विसरून बसला।।
आपल्या हिताच्या गोष्टींचा विचार करण्याऐवजी राजकारण पाहत बसला..!
कोण कुठल्या पक्षाचा … कुठल्या गटाचा … त्यानं कुणाला पाठिंबा दिला… कुणाला पाडलं .. या गोष्टी मोठ्या फुशारकीने चघळत बसला …त्याचा आनंद घेत बसला।। म्हणूनच आपली शेतकऱ्याची आज ही वाईट दशा झाली आहे।। शेती करणे हा धंदा तोट्याचा होऊन बसला आहे।।।
राजकारण्यांना दोष देण्यात काहीही अर्थ नाही, कारण संस्थेच्या चेअरमन पदी आपणच त्यांना बसवलं आहे…! आपण शेतकऱ्यांनीच संस्था सांभाळन्यास लायक नसलेल्या लोकांना निवडून दिले आहे..! त्यामुळे त्याला जबाबदारही आपण शेतकरीच आहोत… हे पक्के लक्षात घ्या…!
सहकार क्षेत्राचा आवाका खुप मोठा आहे.. ! खुपच पोटेन्शल आहे यात..!!
एक म्हण आहे आपल्याकडे,
“गाव करेल ते राव काय करी?”
ह्या म्हणीनुसार,
*सहकाराच्या माध्यमातून शेतकर्यांचे हित दृष्टीत ठेवून जे होऊ शकतं ते एकट्याने किंवा खाजगीकरनाने कधीच नाही होणार…!*
शेतकऱ्यांना लागणाऱ्या सर्व गरजा अगदी सहजतेने भागवण्याची ताकत या सहकार क्षेत्रात आहे..!!
गरज आहे त्या दृष्टीने पाहण्याची…! प्रामाणिक इच्छा शक्तीची…!!
आणि शेतकऱ्यांचे हित हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन काम करण्याची…!!!
*पहिला उद्देश असला पाहिजे, शेती मालाचा उत्पादन खर्च कमी करणे….*
*त्यानंतर शेतकऱ्यांने पिकवलेल्या मालाला योग्य भाव देणे, योग्य ग्राहक शोधून तिथपर्यंत तो पोहोचवणे..!*
आणि *शेवटचा उद्देश शेतकऱ्यांचा दैनंदिन खर्च – जीवनशैली स्वस्तात करणे. जेणेकरून त्याने कमावलेला पैसा त्याच्याकडे टिकेल।।।*
एखाद्या सहकारी संस्थेच्या माध्यमातुन आपण शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारा कच्चा माल खते – बी – बियाणे – अवजारे आदी गोष्टी थेट उत्पादक कंपनीकडून घेऊन एकदम स्वस्तात होलसेल दारात उपलब्ध करू शकतो…
शेतीमाल पॅकिंग आदी साठी लागणारे सहज शक्यते साहित्य स्वतः सहकारी संस्थेने उत्पादित करून शेतकऱ्यांना स्वस्तात उपलब्ध करून देता येऊ शकते…
उदा- पॅकिंग बॉक्स, कात्रण, क्रेट इत्यादी
शेतीत काम करणाऱ्या यंत्रणा लागणारे इंधन सभासद शेतकऱ्यांना संस्थेच्या अधिपत्याखाली स्वस्तात उपलब्ध करून देता येऊ शकतं.!
याने शेतीमालाचा उत्पादन खर्च कमी होऊन शेतकऱ्याचा नफा वाढू शकतो…!
या सहकारी संस्थांच्या माध्यमातून आपण नवनवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत सर्वाधिक वेगाने पोहचवू शकतो..! ते प्रत्यक्षात उतरवू शकतो…!!
तसेच इतर शेतीमालावर प्रकिया करणारे उद्योगही या अंतर्गत उभारता येऊ शकतात..!
कारखान्यात उत्पन्न झालेल्या मालाला राष्ट्रीय – आंतराष्ट्रीय ग्राहक शोधून ज्यास्त फायद्यात त्याची विक्री करता येऊ शकते.
तसेच सहकाराच्या अंतर्गत मोठ मोठे मॉल उभारून सभासद शेतकरी वर्गाला लागणाऱ्या दैनंदिन गरजेच्या वस्तू देखील अगदी स्वस्तात उपलब्ध करून देता येऊ शकतात..!
आरोग्य विषयक सुविधा – शैक्षणिक सुविधा निर्माण करता येतील…!
या गोष्टीसाठी शेतकऱ्याचा होणारा अवाढव्य खर्च थांबवता येऊ शकतो.
याशिवाय स्थानिक पातळीवर रोजगार उत्पन्न होईल… इथला युवकवर्ग इथेच कामाला लागेल….. गावातला पैसा गावातच राहील…. शेती चांगली फायद्याची होईल…!!
म्हणून सांगतोय,
कारखान्यावर निवडून दिलेला व्यक्ती जर, शेतकऱ्यांच्या हिताचा दुरदृष्टीने विचार करणारा असेल तर “शेतकऱ्यांच्या घरातून सहजच सोन्याचा धूर निघू शकतो” एवढं लक्षात राहू द्या…!
आजूनही वेळ गेलेली नाही…,
सहकार क्षेत्रात उमेदवार निवडताना शेतकऱ्यांनो दूरदृष्टी ठेवा…
चारित्र्यवान – प्रामाणिक – लोकहीतवादी दूरदृष्टी असलेल्या व्यक्तीला उमेदवार म्हणून उभारण्यास आग्रह करा…
अशा लोकांचा पॅनल करून त्यांना निवडून आणा..!
कुणा येऱ्या – गाबाळ्याच्या हातात कारखाना – संस्था देऊ नका…! उमेदवाराची लायकी तपासून पहा।।
उमेदवाराने आधी केलेले गफळे, त्याचे आधीचे उद्योग यांना विचारात घ्या!!
त्याच्याकडे पैसा आहे म्हणून त्याला मत देऊ नका।।
“पैसे वाटून निवडून येणारी लोकं, पुढच्या पाच वर्षात वाटलेल्या पैशाच्या हजारोपट वसुली आपल्याच सहकारी संस्थेतून करतात” हे आपण कित्येक वर्षे पाहातो आहोत…! यामुळेच सहकारी संस्था भिकेला लागत आहेत…!
त्यामुळे अशा भ्रष्ट लोकांना वेळीच दाबा…!! त्यांना संस्थेत स्थान देऊ नका..!!
भविष्याचा आणि तुमच्या पुढच्या पिढीचा विचार करून मतदान करा..!!
सहकार वाचला पाहिजे … आणि त्याला आपण सर्वांनी सतर्क राहून जपला पाहिजे।। तरच शेती करणाऱ्याचे हित होईल…!!!
*डॉ. सौरभ बाजीराव कदम,*
*M.D. (आयुर्वेद), पुणे*
Contact details