ऑक्टोबर हीटमध्ये काय खावे आणि काय टाळावे? शरद ऋतूतील आहार-विहार
ऋतुचर्या
आयुर्वेदामध्ये कोणत्या ऋतूमध्ये आपण कोणता आहार आणि कोणते विहार सांभाळायला हवेत, याबाबत काही नियम सांगितले आहेत. याला आपण ‘ऋतुचर्या’ असे म्हणतो.
आपल्याकडे एकूण सहा ऋतू असतात:
वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर.
हे सहा ऋतू मराठीतील बारा महिन्यांमध्ये विभागले गेले आहेत.
- चैत्र – वैशाख: वसंत
- ज्येष्ठ – आषाढ: ग्रीष्म
- श्रावण – भाद्रपद: वर्षा
- अश्विन – कार्तिक: शरद
- मार्गशीर्ष – पौष: हेमंत
- माघ – फाल्गुन: शिशिर
हे ऋतू अशा प्रकारे महिन्यांनुसार विभागले गेले असले, तरी आयुर्वेदामध्ये ऋतू विभागणी ही केवळ कॅलेंडरनुसार केली जात नाही. त्या ऋतूची दिसणारी लक्षणे लक्षात घेऊन तो ऋतू ओळखावा, असे आयुर्वेदामध्ये सांगितले आहे.
शरद ऋतू

सध्या शरद ऋतूचा काळ आहे. या काळात जाणवणाऱ्या उष्णतेला आपण ‘ऑक्टोबर हीट’ असे म्हणतो.
या ऋतूमध्ये आयुर्वेदानुसार पित्ताचा प्रकोप होतो.
बाहेर जसा सूर्यप्रकाश प्रखर होतो, तसाच शरीरामध्ये पित्ताची लक्षणेही अधिक तीव्रतेने जाणवू शकतात.
उदाहरणार्थ, काही लोकांना:
- त्वचेवर पुरळ येणे
- चेहऱ्यावर वांग येणे
- पिगमेंटेशन होणे
- पायांची जळजळ होणे
- पित्त वर आल्यासारखे वाटणे
- मळमळ होणे
- प्रसंगी पित्ताची उलटी होणे
- वारंवार डोके दुखणे
अशी लक्षणे दिसू शकतात.
या ऋतूमध्ये काय काळजी घ्यावी?
या ऋतूमध्ये हा त्रास होऊ नये म्हणून आपण काही गोष्टी सांभाळायला हव्यात.
आहार
जेवणामध्ये मुख्यत्वे करून गोड पदार्थांचा उपभोग घ्यावा.
गोड रसाचे सरबत, गुलकंद, मोरावळा आणि काळे मनुके यांचा आहारामध्ये वापर करावा.
या काळात ड्रायफ्रूट्समध्ये:
- खारीक
- खोबरं
- खजूर
- काळे मनुके
यांचा वापर करता येईल.
फळभाज्या
वेलीवर येणाऱ्या फळभाज्या खाव्यात. उदाहरणार्थ:
दोडका, पडवळ, दुधी, लाल भोपळा, घोसावळ, तोंडले, कारले इत्यादी.
भाकरी आणि चपाती
जेवणामध्ये एक वेळ तरी ज्वारीची भाकरी असावी आणि एक वेळ गव्हाची चपाती असावी.
गोड पदार्थ
शिरा, खीर इत्यादी गोड पदार्थ चालतील.
काय टाळावे?
आलं, लसूण, हिरवी मिरची, ठेचा, वेगवेगळे सॉसेस, पॅक्ड फूड, सॉस इत्यादी गोष्टी टाळाव्यात.
आंबवलेले पदार्थ शक्यतो टाळावेत.
विहार
- उन्हामध्ये अनावश्यक फिरणे टाळा.
- अति व्यायाम करू नये.
- भूक आणि मल-मूत्र विसर्ग या गोष्टी अडवून ठेवू नयेत.