Blog

।। आयुर्वेदोक्त आहारात काय असावे ? ।।


Dr Saurabh B. Kadam
  M.D.(Ayurved), Pune

Ayurveda Health Group - Join Free

ज्या भागात जे नैसर्गिकरित्या उत्तम प्रकारे पिकते, त्या अन्नधान्यांचा त्या भागात राहणाऱ्या लोकांच्या आहारात प्रामुख्याने समावेश असावा.

    महाराष्ट्राचा विचार करायचा झाला तर, ज्वारी – बाजारी हे प्रमुख धान्य आहारात असावी. त्यानंतर तांदुळ – खपली गहु यांचा समावेश व्हावा. तर सर्वात शेवटी नेहमीच्या गव्हाचा नंबर लागतो.
   आहारात वापरायची धान्ये ही कमीत कमी एक वर्ष तरी जुनी असावी. पुढच्या वर्षी लागणारे धान्य या वर्षीच खरेदी करून ठेवावी, जेणे करून ते खाण्यापर्यंत जुने होइल. जुनी धान्ये उपलब्ध नसतील तेव्हा धान्ये भाजून आहारात घ्यावी।। या धान्याचे पीठ वेळोवेळो दळून आणलेली असावी. म्हणजे तयार आटा  – इडली जामुन आदीची तयार पीठे हे सारे अपथ्य आहे…! आजार करणारे आहे…!! म्हणून तयार पीठे घरी आणु नयेत।।

चवीत मोठा बदल असतोच दोन्ही पिठात पण त्याशिवाय एक साधी गोष्ट विचारात घ्या – आपण स्वतः जाऊन स्वतःच्या नजरेसमोर पिठाच्या गिरणीतून दळून आणलेली ज्वारी – बाजरी – गव्हाची शुद्ध पिठे एक महिन्यापेक्षा ज्यास्त दिवस चांगली राहात नाहीत… त्याची चव बदलते – कडू होतात – त्याची भाकरी – चपाती बनत नाही।। पण विकत आणलेली बाहेरची तयार पॅकिंग मधली पीठे सहा महिने – वर्ष काहीही न होता तशीच टिकून राहतात. यावरून विचार करा काय झोल आहे ते..!!

मैदा – रवा पण फार क्वचित आहारात असावा..! त्याचं आहारातील वाढतं प्रमाण आजारात आमंत्रण देणारं असतं…!!

रक्तशाली (लाल रंगाचे तांदूळ) व षष्ठी तांदूळ (साठ दिवसात येणारे साठी तांदूळ) हे जुने तांदूळ आरोग्यदायी आहेत । पॉलिश न केलेला जुना तांदूळ आहारात ठेवावा..!!

कडधान्यामध्ये मुग सर्वात उत्तम असून आधुनिक शास्त्रानुसार वर्णीत यातले  प्रोटीन हे सहज पचणारे आहे..! अंगाला सहजतेने लागणारे आहे..!!  म्हणून कोनत्याही रोग्याला आम्ही वैद्य विशेषत्वाने मुगडाळीचे वरण – मुगडाळीची खिचडी खाण्यास सांगत असतो ।।

इतरही कडधान्ये खाण्यात आवर्जून असावी परंतु पचायला जड असल्या कारणाने व वात वाढवणारी असल्याने कडधान्ये कमीच खायची असतात. म्हणून तर आम्ही त्याला कडेकडेची धान्ये म्हणतो.

मोड आलेल्या कडधान्ये भरपूर खाण्याचा ट्रेंड जरी आज असला तरी त्या मोड आणलेल्या कडधान्यातले प्रोटिन्स पचायला फारच जड असतात. ती पचवण्यासाठी त्या खाणाऱ्या व्यक्तीची पचनशक्तीही खूप जोरदार असावी लागते अन त्याचे कामही तसेच कष्टाचे असावे लागते।।  तरच ती उपयोगाची आहेत..! 

नाहीतर भरपूर मोड आलेलं खाऊन, ते जड अन्न न पचल्याने नको तिथे मोड येतात लोकांना…!  

Piles

– ज्या भागात ज्या तेलबिया पिकतात, त्या तैल बियांचे तैल त्या भागातील लोकांनी आहारात ठेवावे.
उदा – कोकणात नारळ तेल
       – बाकी महाराष्ट्रात शेंगदाना तेल, करडई तेल, सूर्यफूल तेल
       – उत्तर भारतात मोहरी तैल
  या प्रमाणे….!

किंवा आपल्याला रुचेल – सहजतेने पचेल आशा तेलांचा वापर आलटून पालटून करावा।

मात्र आहारात वापरायचे तेल हे घाण्यातुन काढलेले असावे. लाकडी घाणाच पाहिजे असा हट्ट नाही, मात्र तेल बनताना त्याला बाहेरून वेगळी उष्णता दिलेली नसावी. त्यावर रसायने वापरून Refind प्रक्रिया केलेली नसावी. कुठले ही Preservative वापरलेले नसावेत.

  जर तैल बियांतून पूर्णपणे तेल काढण्यासाठी बाहेरील उष्णतेचा वापर केला जात असेल तर उष्णता खाऊन बनलेलं तेल आपल्या शरीराला स्नेहित करण्यास उपयुक्त नाही।।

असे उष्णता खाल्लेलं खर पाकित जळकं तेल शरीरात अर्धवट पचून बॅड कोलेस्टेरॉलची निर्मिती अधिक करतं।।
जे पुढे शरीरात रक्ताच्या गुठळ्या निर्माण करून हृदयविकार, DVT, मेदोरोग आदी उत्पन्न करतात।।।

Ayurveda Health Group - Join Free

दूध देणाऱ्या प्राण्यात गोदुग्ध म्हणजे गावरान देशी गाईचे आणि फिरून शेलका झाडपाला खाणाऱ्या शेळीचे दूध उत्तम ..!

त्या घाणेरडा वास येणारा – खदाड जरशी नामक प्राणी हा दुधाचे उत्पादन वाढवायला उपयोगी आहे.. आपल्या आरोग्याला नाही …!

त्या जरशीच्या वासराला काळपातली त्याची आई देखील ओळखता येत नाही।। दिसल त्या गाईला पितं ते, अन त्यांच्या लाथा खातं ।। कधी मालकाच्याही टांगड्यात घुसतं..! त्याला किती पाणी प्यावं – किती खावं हेही कळत नाही…! ज्यादा खाऊन – ज्यादा पाणी पिऊन डरंगळाय लागतं।।  एवढं तर विचित्र असतं ते…!

त्याच्या शारीरिक व मानसिक कमकुवत पणामुळे शेतातल्या कामालाही त्याचा वापर म्हणावा तसा होत नाही..! अश्या त्या जरशीच्या दुधाने आपलं पोषणही तसेच होईल… म्हणून त्या जारशीचं दुध आपल्या आहारात नसावं..!!

दुधावरची साय विरजं लावून बनलेल्या ताज्या दह्याला घुसळून, वर आलेले लोणी वेगळे काढून, खाली शिल्लक राहिलेले ताजे ताक पचन संस्थेला मजबूत बनवणारे आहे. जिरे ओवा पुड टाकून ते आवश्य प्यावं ।। या ताज्या ताकाला फोडणी देऊन केलेली कढी – मठ्ठाही उत्तम आहे।। पण ताक मात्र ताज्या दह्याचे ताजे आणि गोडसर असावे. बनवल्या पासून 5 – 6 तासात वापरावे. पिशवीतले 20 दिवसाची expiry असलेले, फ्रिजरला ठेवलेले ताक नसावे।। 

दही घुसळून बनलेल्या त्या ताकावर आलेले लोणी साक्षात त्या भगवंताला, त्या बाल श्रीकृष्णाला प्रिय होतं…!  त्याची निंदा करायचे धाडस कोण करेल बरं.??

त्या लोण्याने मज्जेचे म्हणजे मेंदूच्या पेशी व मज्जा तंतू यांचे पोषण होत असते…! बाल गोपाळांना ते मनसोक्त खाऊ द्यावे..!
बुद्धीचा विकास या लोण्याने खुप उत्तम प्रकारे होतो…!!

घरातलं तुप हे साजूक तुप असावं…! साजूक म्हणजे तापवलेल्या दुधावरची साय काढून, त्यात विरजण टाकून बनवलेल्या दह्याचे घसळून लोणी काढून, त्या लोण्याला कढवून बनवलेले तुप हे साजूक तुप असतं…!

दुधावरची साय – मलई काढून किंवा डेअरी मध्ये कच्च्या दुधातून वेगळे केलेले फॅट गरम करून बनलेले तुप हे तुप नसून  डालडाच आहे ।। हे असले डुप्लिकेट तुपचं शरीरात बॅड कोलेस्टेरॉल वाढवून आजार तयार करते।। 

आयुर्वेदानुसार असे अर्धवट संस्काराचे (अर्धवट प्रोसेस ने बनलेले ) तुप हे आम दोषयुक्त असून हे आपल्या शरीराला आजारासाठी पोषक बनवते।। म्हणून असे दोषयुक्त तुप न खाल्लेले बरे..!

साजुक तुप आणि कोलेस्टेरॉल..!

शुद्ध गोडधोड खाण्याला आयुर्वेदाचा विरोध नाही…! स्वच्छतेत बनलेला शुद्ध उसाचा रस मनसोक्त प्यावा।। हवा तेवढा ऊस सोलुन खावा ।। सीता म्हणजे मोठी खडीसाखर किंवा खांड साखर खाण्यात वापरावी।।  केमिकल न वापरता बनलेला गुळ वर्षभर जुना झाल्यावर खाण्यात घ्यावा।। काकवी वगैरे इक्षु विकृती मात्र जरा बेतानेच खाव्या।।।

– आहारात खाणीतून मिळणाऱ्या सैंधव मिठाचा वापर करावा । मीठ कुठलेही असले तरी मिठाचा वापर कमीत कमीच असावा. कारण ते अभिष्यंद निर्माण करणारे आहे।।

अभिष्यंद म्हणजे सोप्या भाषेत सांगायचे झाले तर, गॅसवर ठेवलेल्या कढईत कांदा किंवा इतर कुठली भाजी परतनं चालू असताना, त्यात मीठ टाकलं की त्याला कसं पाणी सुटते, अगदी तसंच जर आपल्या आहारात मीठाचा वापर अधिक असेल तर त्या मिठाने शरीरात सुटलेले अधिक प्रमाणातील पाणी, वाढलेली आद्रता ही आजाराला पोषक असते।। म्हणून मीठ कमीत कमी खावं।।

   सध्या वापरात असणाऱ्या सर्वात निकृष्ट, सर्वाधिक अभिष्यंद निर्माण करणाऱ्या Iodine युक्त मिठाच्या जागी किंवा समुद्रातुन मिळणाऱ्या मिठाच्या जागी खनिज स्वरूपातील सैंधव मिठाचा वापर करावा. कारण तेच सर्वप्रकारच्या मिठात श्रेष्ठ आहे।।

अभिष्यंद निर्माण करणारे दही – आंबवलेले पदार्थ – लोणचे वगैरे मिठाच्या साठवणूकितील पदार्थ – Preservative टाकून साठवलेले पदार्थ – मासे यांचेही प्रमाण कमीत कमी असावे।।

आहारीय पदार्थ टिकून राहावे यासाठी वापरण्यात येणारे रासायनिक Preservatives हे एक प्रकारचे विषय आहे. बऱ्या च अभ्यासानुसार ते कॅन्सर व्याधी होण्यासाठी मदत करणारे आहे असेही सांगितले जाते।।

म्हणून तयार पॅकिंग मधले पदार्थ, ज्यूस, स्वयंपाकात वापरायच्या लसूण – आद्रक पेस्ट, जाम, बाहेरील लोणची आदी Preservatives टाकलेले पदार्थ शक्य तेवढे टाळावे।

फळांचा राजा जरी आंबा असला तरी आरोग्यासाठी फळामध्ये सर्वश्रेष्ठ मृदीका (मनुका /बेदाणे – dry Greps – khismis –  raisins) सांगितली आहे. त्या पाठोपाठ आवळा – डाळिंब – बोर या फळांना मान दिला गेला आहे.  याशिवाय त्या त्या ऋतूत पिकणाऱ्या सिझनल फळांचा मनसोक्त आस्वाद त्या त्या ऋतूत आवश्य घ्यावा।।

आंबा सोडून कुठलेच फळ दुधाबरोबर खाऊ नये… मिल्कशेक प्रकार हा विरुद्ध आहार असून त्वचा रोगाचे कारण आहे..!

दोडका – कारले – शेवगा – गोसावले – पडवळ – दुधी भोपळा आदी लांब भाज्या अधिक आरोग्यदायी असल्याचे जाणवते. तर त्या मानाने पालेभाज्या कमीच खायला सांगतो आयुर्वेद… ! त्यातल्या त्यात तांदुळसा – लाल माठ – राजगिरा या पालेभाज्या अधिक पथ्यकर म्हणजे खाण्यास उत्तम सांगितल्या आहेत..!

शुष्क शाक (सुक्या पालेभाज्या ) व शुष्क मांस (शिळे/ सुकवलेले मांस) आयुर्वेदाने वर्ज्य सांगितले आहे।।

जांगल प्रदेश म्हणजे कोरड्या  – उष्ण प्रदेशातील फिरून खाणाऱ्या प्राण्यांचे पक्षांचे मांस आयुर्वेदानुसार शरीराला उपयुक्त आहे।। कोंडुन ठेवलेल्या – रोगी – बाल किंवा वृद्ध अवस्थेतील प्राण्यांचे पक्षांचे मांस न खाण्यास आयुर्वेद सांगतो.

आयुवेद चिकित्सेतील ” सामान्य विशेष सिध्दांता”  नुसार, आपण जसा आहार विहार घेऊ, त्याच द्रव्यानुसार –  गुणांनुसार – कर्मानुसार आपले शरीर बनते।।

उदाहरण सांगायचे झाले तर,

त्या 40 दिवसाच्या प्रोटीन्स आणि हार्मोन्स डाऐटवर पोसलेल्या कमकुवत हाडाच्या ब्रॉयलर कोंबडीचे मांस आपल्या  खाण्यात भरपूर असेल तर त्या कोंबडीतील कमकुवत कॅल्शियम तुमच्या हाडांना मिळून तुमची हाडेही तशीच कमकुवत बनतील, हार्मोन्सच्या वापराने 40 दिवसात 3kg पर्यंत फुगलेली कोंबडी खाऊन तुम्हीही तसेच फुगाल आणि मेंदूनेही तसेच सुंद व्हाल।। हार्मोनल Imbalance होऊन हार्मोन्स संबंधी तक्रारी तुमच्यात उद्भवतील..!

तसेच जेवढं शिळं अन सडकं खाल तशीच कुजकी निर्मिती आपल्या शरीराची होत असते।।

जेवढं ताजं खाऊ, तेवढं आरोग्यासाठी उत्तम।।। म्हणून जिवांन्न खायला सांगितलं जातं।।

जिवांन्न म्हणजे ज्याच्यामध्ये जिवंत पणा आहे जसं की, हिरवी फळे – पालेभाज्या – सॅलेड इत्यादी. 

किंवा ज्याच्यात जीव उत्पन्न करण्याची ताकत आहे असे बीज..! जसं की मुग – मसूर – गहु – ज्वारी – शेंगदाणा आदी धान्ये…!  ज्यावर पचनास हलके करण्यासाठी अग्नीची प्रक्रिया करून बनलेले गरम गरम किंवा ताजे अन्न खावे..!

शिळं म्हणजे काय?
तर एकदा बनवलेलं अन्न, साधारण 8 ते 10 तासांनी शिळं।।

पाणी सुद्धा ..!!
पिण्यासाठी एकदा उकळून घेतलेलं पाणी 8 ते 10 तासांनी फेकून द्यावं।। पुन्हा वापरू नये।।

दूध तुप सोडलं तर ,
बाकी सारं दुसर्यांदा गरम केलेलं शिळंच।। म्हणून दुसर्यांदा गरम करून खाऊ नये।।

Immunity Booster

“बनवल्या पासून 8 -10 तासांनी शिळं”  असा जरी नियम असला, तरीही सकाळी बनवलेले अन्न संध्याकाळी थोडं फार चालेल, कारण दिवसाच्या सूर्यप्रकाश व स्वच्छ वातावरणाने ते चांगलं राहतं।।

पण संध्याकाळी/रात्री बनवलेलं अन्न सकाळी शिळेच बरं का..!! रात्रीचा भात पण सकाळी शिळाच।। म्हणून शक्यतो रात्रीचं शिल्लक सकाळी खाऊ नका।।

पण जर तुम्ही धूळ – धूर – प्रदुषित वातावरणात किंवा कोंदट –  अंधाऱ्या जागेत राहत असाल, स्वच्छ सूर्यप्रकाश आपल्या घरात येत नसेल तर मात्र सकाळी बनवलेले अन्न पण संध्याकाळी खाऊ नये।। कारण त्या दुषित वातावरणाने ते अन्नही लौकर दूषित होते।।

आवडीचा पदार्थ असेल तर कधीतरी ठीक आहे, पण नेहमीच शिळं खाण्याची सवय ज्यास्तीच घातक असते।। आजारी व्यक्तींना – वृद्ध – गर्भिणी – सुकुमार व्यक्ती यांना तर ते विषचं ठरतं।।

ते सँडविच – पिझ्झा – बर्गर वगैरे हे जिभेचे चोचले पण शिळेच बरं का…!  ते बिस्कीट पाव पण शिळेच…!! तो तयार बेस पण शिळाच….! एकदा प्रोसेस करून ठेवलेलं सगळं आठ तासांनी शिळेच बरं का..!

आणि ते दुसऱ्यांदा गरम केलं की महाशिळं…! रोगटच ..!! ते आजाराला आमंत्रण देणारंच..!!!

फ्रीज किंवा फ्रिजर मध्ये ठेवलेलं अन्न पचायला अधिक जड होतं. पचनसंस्थेला बिघडवतं ।।  म्हणून त्याचा वापरही तोडकाच असावा।

कुकर मध्ये अन्न शिजण्या ऐवजी उष्णता आणि प्रेशर यामुळे ते फुटतं।। पचायला अधिकच जड होतं।। पचायला जड झाल्याने ते आपलं पोषण करण्या ऐवजी ते आपल्याला फुगवतं।। म्हणून शरीराच्या उत्तम पोषणासाठी ते कधीच योग्य नाही।। अन्न शिजताना त्यातून वाफ बाहेर गेली तर ते अन्न पचनास सुपाच्य होतं असं आयुर्वेद सांगतो।। म्हणून कुकर मध्ये शिजलेले अन्न खाऊ नका।।

–  विहीर, ओढे, तलाव, नदी, झरे, कुपवहिनी या नैसर्गिक स्तोतातून घेतलेलं पाणी आपण प्लास्टिक – सिमेंट आदी टाक्या किंवा भांड्यात भरून ठेवल्यास आठ तासांनी त्यात आम्लता उत्पन्न व्हायला लागते।। आणि ते शिळे पाणी व्याधी उत्पन्न करणारे बनते।।

(आता तुम्हीच ठरवा, Preservative टाकलेलं बाटलीतलं सीलबंद पाणी किती प्यायचं ते..?)

म्हणून पिण्याचे पाणी साठवणूक करण्यासाठी मातीचा घडा, रांजण हे उत्तम आहे।। तसेच मोठ्या साठवणुकीला दगडाच्या बांधकामात बनवलेली पाण्याची टाकी पाण्याला शुद्ध ठेवणारी आहे.

शहरीभागात आपल्याकडे येणारं पाणी हे आधीच कारखाने – गटारीची घाण खाल्लेले असते, त्यानंतर किमान महिनाभर तरी जलशुद्धीकरनांच्या सिमेंटच्या वेगवेगळ्या टाक्यात मध्ये फिरत असते, त्यात त्याच्यावर क्लोरीन गॅस वगैरे शुद्धीकरणाच्या भरपूर प्रक्रिया केल्या जातात।।
त्यानंतर आपल्या बिल्डिंगच्या टाकीत आणि पुन्हा आपल्या घरातल्या फिल्टर मधून आपल्या पिण्याच्या पाण्याच्या पिंपात येतं..!

आयुर्वेदाच्या तत्वानुसार, असे शिळे पाणी किमान अग्नी संस्काराने उकळून शुद्ध करून प्यावे।।

आयुर्वेदानुसार, पाण्याचंही पचन व्हावं लागतं।। पाणी जर आपल्या शरीरात पचत नसेल तर आजाराला आयतं घर मिळतं।। म्हणून  पाण्याच्या निर्जंतुकरणा बरोबरच ते पुढे पचायला हलकं व्हावं यासाठी ते उकळून गार केलेलं असावं असं आयुर्वेद सांगतो।।

उन्हाळ्यात पाणी उकळायला आळस केला तरी चालेल एक वेळेस …!
पण पावसाळ्यात, एक ऋतू बदलून दुसरा ऋतू चालू होतं असताना, आजाराची साथ चालू असतानाच्या वेळी पाणी उकळून प्यावं. तसेच वृद्ध – आजारी व्यक्ती – गर्भिणी – आपला बालक 5 वर्षाचा होई पर्यंत –  सारखी आजारी पडणारी बालके यांच्यासाठी मात्र पाणी उकळून गार करून पिणे फायद्याचे आहे।।

एकदा उकळुन गार केलेलं पाणी ज्यास्तीत ज्यास्त 8 तासापर्यंत  पिण्यायोग्य असतं, त्यानंतर ते वापरू नये।।

–  फ्रिजचे पाणी आयुर्वेदानुसार गुरु होत असल्याने ते पचनसंस्थेचे विविध आजार निर्माण करणारे आहे. म्हणुन सर्वथा ते वर्ज्य करावे.

    चहा-कॉफी ही पेये आयुर्वेदात नाही. पचन संस्थेच्या रात्रभराच्या विश्रांतीनंतर सकाळी लागलेली कडकडीत भुक आपण चहा कॉफी पिऊन मारत असतो..! चहा कॉफीतलं टॅनिन अन कॅफिन हे व्यसन लावणारे घटक आहेत।।  त्यामुळे आयुर्वेदिक चहा म्हणून जाहिरात बाजी करणाऱ्या धंदेवाल्यांना व त्यांच्या चहाला वेळीच दुर लोटा. हिरवा – काळा – लाला – पिवळा असले सगळे टी हे पैसे कमवायचे उद्योग आहेत।। भुक मारायची औषधी आहेत …! एक प्रकारचे हे व्यसन आहे।। या सगळ्यांना दुर लोटा।।

   आरोग्य हवं असेल तर भुक सांभाळायला शिका ।। तहान सांभाळायला शिका ।। तिला मारू नका।। किंवा अधिक खाऊन – पिऊन तिला पूर्णच जिरवू नका।।  लागलेल्या भुकेला वेळोवेळी योग्य प्रमाणात उत्तम गुणवत्तेचा आहार द्या।। आपल्या गाडीत कसं आपण चांगल्या गुणवत्तेचं ऑइल टाकतो अगदी तसं ।।
तहाने नुसार पाणी प्या।। तांब्या तांब्या पिऊन हांडे भरू नकात।।

औषध केवळ बाटल्या आणि गोळ्यांमध्येच असतं असं नाही..*

सर्वात पहिले औषध म्हणजे आपला योग्य पद्धतीने घेतलेला आहार आहे…!

*जेवताना जेवणाचा माहोल तयार करून, आनंदी व प्रसन्न मनाने लक्षपूर्वक व्यवस्थित चावून त्या अन्नाचा आस्वाद घेत प्रमाणबद्ध अन्न ग्रहण करणं * हे औषध आहे.

*योग्य पद्धतीने शुद्ध आणि सात्विक भावाने  केलेला कायिक – वाचिक – मानसिक उपवास* हे औषध आहे.

नैसर्गिक देशी – सेंद्रिय पद्धतीने पिकलेले ताजे शुद्ध अन्नधान्य फळे भाज्या हे औषध आहे.

सोबतीला शुद्ध पाणी –  शुद्ध हवा –  स्वच्छ सूर्यप्रकाश* हे औषध आहे.

*नियमित व्यायाम –  योग व ध्यानधारणा करणे* हे औषध आहे.

*रात्रीची शांत आणि गाढ झोप*  हे औषध फार मोठं आहे.

* वैवाहिक ब्रह्मचर्य पालन * करणं हे औषध आहे.

*चांगले मित्र-मैत्रिणी जोडणं अन त्यांच्याशी प्रसन्न मनाने राहून, सुख – दुःख वाटून घेणं हे औषध आहे.

*कृतज्ञता आणि प्रेम* ही औषधे आहेत.
*राग – भांडण प्रसंगी मौन* हे औषध आहे.

*जिवनात आलेल्या दुःखाला पाणी लावत न बसता त्याला मागे ढकलून येणार प्रत्येक क्षण आनंदी करणं* हे मोठं औषध आहे.

*कुटुंबासह सहलीला जाणं* हे औषध आहे.

*सतत आनंदी व हसत मुख असणं* हे औषध आहे.

*अगदी लहान पोरांसारखा खळखळून हसणं* हे औषध आहे.

लेखाचा भरपूर विस्तार झालाच आहे तरीही शक्य तेवढा अतिविस्तार टाळून शक्य तेवढा आयुर्वेद थोडक्यात सांगायचा प्रयत्न केला आहे इथं…! 

सर्वांना अस्सल आयुर्वेद शास्त्र समजेल उमजेल अशा भाषेत विस्ताराने अन फुरसतीनं  लिहिलेलं “आयुस्पर्श”  हे अस्सल आयुर्वेद ज्ञानाचे पुस्तक लौकरच आपल्या भेटीला देऊ…! तेव्हा आयुर्वेद विस्तारानं समजुन घ्या..!! आणि आरोग्यवान व्हा..!!!

तूर्तास सांगितलेल्या गोष्टीतलं प्रयत्नपूर्वक शक्य होईल तेवढं पाळायचा प्रयत्न करा।।। निश्चितच भरभरून फायदा होईल।।

पुर्वीची लोकं देशी वाणाचे अन गावखत टाकून नैसर्गिकरित्या पिकलेलले अन्न खात होते. म्हणून पूर्वीच्या लोकांचे शरीर बल उत्तम होतं, पाचन शक्ती ही उत्तम होती।।कच्च्या दुधापासून फळे कंदमुळे असं काहीही खाऊन पचवण्याची ताकत ते ठेवत होते।।।

आज आपण खातो हायब्रीड अन ते पिकवताना भरभरून रसायनिक खते व किटकनाशके वापर केलेली अन्न धान्ये अन त्यानंतर ते पिकांवं अन टिकावं म्हणून Preservatives स्वरूपात रसायनांचा वापर केलेलं अन्न।।

म्हणून तर आपलं ” हे दुखतं, ते दुखतं” सारखं चालू असत..! म्हणून देशी वाणांच्या देशी अन्नाची मागणी चालू करा।। नक्कीच ते तुम्हाला उपलब्ध व्हायला लागेल।।

जसा फॅमिली डॉक्टर शोधता, तसा फॅमिली शेतकरी शोधा।। तुमची मागणी पाहून तोही नक्की पुरवेल तुम्हाला सगळं।।

लेख कसा वाटला त्याबद्दल खाली दिलेल्या comment box मध्ये आपली प्रतिक्रिया नक्की द्या।।

जय आयुर्वेद!!!

Dr Saurabh B. Kadam
     M.D.(Ayurved), Pune

आयुर्वेद उपचार व पंचकर्म चिकित्सक
Contact no 9665010500/7387793189

आप्तश्री आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक, दापोडी – पिंपळे गुरव रोड, शिवदत्त नगर, पिंपळे गुरव, पुणे 411061

Assistant Professor & Ayurved Consultant,
Dr D Y Patil College Of Ayurved & Research Center, Pune 411018

आपल्या नैसर्गिक पद्धतीच्या जीवनशैलीचें महत्व जाणून घेण्यासाठी आणि अस्सल आयुर्वेद जाणून घेण्यासाठी *आयुस्पर्श आयुर्वेद चॅरिटेबल ट्रस्ट व आप्तश्री आयुर्वेद, पुणे*  द्वारे चालवला जात असलेल्या,

*”AYURVED (आयुर्वेद)”*

Chanal Link:
https://t.me/shriayurvedic

या चॅनलला जॉईन व्हा।। तज्ञ वैद्यांकडून हा चॅनल हाताळला जातोय।

जय आयुर्वेद ।। जय आचार्य चरक ।।




 

Click here for sharing blog link on your social media

Comments

  • November 20, 2021
    reply
    भगवंतराव पवार, चंदननगर, पुणे.

    फारच उपयुक्त माहिती आहे डॉक्टर साहेब. धन्यवाद.

  • November 20, 2021
    reply
    Vikas Mahale

    खुपच . उपयुक्त माहिती आहे डॉ . साहेब खुप खुप धन्यवाद

  • November 20, 2021
    reply
    Pranay

    👍🏻👍🏻

  • November 20, 2021
    reply
    VISHAL DUPADE

    खरच खरा आयुर्वेद काय आहे ते या लेखातून अतिशय उत्तमरीत्या समजते आणि त्याचा दैनंदीन जीवनामध्ये खूप फायदा होतो

  • November 21, 2021
    reply
    Dr Vidya Patil

    👍👍👍

  • November 21, 2021
    reply
    Ankita Kurhade

    👌🏻👍🏻

  • November 24, 2021
    reply
    Vaibhav Harischandra Vyavahare

    खूप छान व उपयुक्त माहिती

  • November 29, 2021
    reply
    Kalyani Prashant Jadhav

    छान लेख 👌👌👌

  • November 30, 2021
    reply
    Ankush Mali

    खरंच डोळे उघडणारा लेख आहे धन्यवाद सर .तुमच्या पुस्तकाची आम्ही वाट पाहतो

  • July 11, 2022
    reply
    दादासाहेब कदम

    हा लेख खूप आवडला आणि चांगला आहे

  • July 11, 2022
    reply
    Pallavi

    ekdam chan mahiti, Thank you for sharing

  • July 11, 2022
    reply
    Priya gaikwad

    खुप छान आणि फायदा होणारी माहिती तुम्ही आमच्या पर्यंत पोहोचवल्या बद्दल धन्यवाद सर.🙏🏽😊

  • July 13, 2022
    reply
    Dipak shitole

    अतिशय सुंदर माहितीपूर्ण लेख .सर आपला प्रत्येक लेख मी अनेक वेळा वाचतो. .आयुर्वेदीय विषयाची इतकी सुंदर मांडणी एखादा साहित्यिकच करू शकतो. या अर्थाने आपण आयुर्वेदिक साहित्यकार आहात . आपल्या हातून अशीच जनसेवा घडो हीच आज गुरुपौर्णिमेनिम्मित शुभेच्छा .

  • August 6, 2022
    reply
    Kalpana Gaikwad

    खूपच छान माहिती…अशी कोणी डॉक्टर सांगत नाहीत…वेळेअभावी की आणखी काही…पटापट पुड्या देऊन पुढचा पेशंट तपासायला घेतात.उपयुक्त माहिती धन्य वाद

  • December 14, 2022
    reply
    Gouri chandarkar

    Very informative.
    Thanks for sharing such a great knowledge.

  • March 26, 2023
    reply
    sudhir ramdasi

    आहाराच्या वाईट सवई आणि आरोग्य संबंधित चांगली माहिती दिली आहे

  • March 30, 2023
    reply
    Dr Soniya Mhatre

    Sir khup chan article .

  • Ayurveda Health Group - Join Free

Leave a comment

Ayurveda Health Group - Join Free
error: Content is protected !!