Blog

गर्भिणी परिचर्या : गर्भिणीचा सामान्य आहार – विहार

– Dr Saurabh B Kadam M. D. (Ayurved), Pune

Ayurveda Health Group - Join Free

गर्भधारणा झाल्यानंतर प्रसुती होईपर्यंतच्या काळात गर्भिणी स्त्री ने घ्यावयाची काळजी ही स्वत:चे शरिर गर्भाला सांभाळण्यास सक्षम रहावे म्हणून, त्याचप्रमाणे गर्भाची वाढ व सर्वांगीण विकास व्हावा म्हणून व नंतर बाळासाठी सुयोग्य व पुरेसे दूध उत्पन्न व्हावे म्हणून घ्यायचा असतो.

शुक्र (पुरुष बीज )आणि शोणित (स्त्री बीज) संयोगाने गर्भाची निर्मिती होत असते. आयुर्वेद शास्त्रानुसार गर्भाची निर्मिती, वाढ व विकास ही सहा गर्भोत्पादक भावांमुळे गर्भाची निर्मिती होत असते.

1) मातृज भाव 2) पितृज भाव 3) आत्मज भाव 4) सात्मज भाव 5) रसज भाव 6) सत्वज भाव

जो आहार गर्भिणी स्त्री घेईल व जो विचार करेन त्याचाच परिणाम गर्भावर होणार आहे. म्हणून खाली सांगितलेल्या गोष्टी गर्भिणीने व्यवस्थित पाळायचा प्रयत्न करायाचा आहे.

• स्वयंपाकाची जागा स्वछ, पवित्र, मन प्रसन्न ठेवणारी व हवेशीर असावी. स्वयंपाक करणार्‍याव्यक्तिची गर्भिणीसाठी स्वयंपाक करताना शारीरिक स्वच्छतेबरोबर मनाची निर्मळता, मनातील भाव या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत.स्वयंपाकी व्यक्तीने “हे बनवत असलेले अन्न आपल्या सत्वाने गर्भवतीचे व अन्न ग्रहण करणार्‍याचे पोषण करो.” हा भाव मनात ठेऊन स्वयंपाक करावा.

क्रोध-मत्सर-शोक-लोभ-द्वेष-अहंकार आदि भाव जर अन्न बनवणार्‍याच्या मनात स्वयंपाक बनवताना असतील किंवा अन्न ग्रहण करताना अन्नग्रहण करणार्‍याचा मनात असतील तर त्याचा अन्नावरती प्रतिकूल प्रभाव पडतो. तसेच भाव त्या अन्नाने पोषित होणार्‍या जिवाच्या मनात निर्माण होतात. तेच भाव पोषित होतात.
• शक्य असल्यास आहार ग्रहण करण्यापुर्वी तो भगवंताला नैवेद्य दाखवावा किंवा गोमातेला खाऊ घालावा. अन्नाची प्रशंसा करत अन्नदात्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करत प्रसन्न मनाने अन्न सेवन करावे.


जेवणाची जागा स्वछ असावी. टी.व्ही.च्या आवाजात गोंगाट किंवा टी.व्ही.पाहत गाणी ऐकत, मोबाइल वरती बोलत, गेम खेळत गर्भिणीने आहार सेवन करू नये. जेवताना अन्नवरती पूर्ण लक्ष देऊन व्यवस्थित अन्न चाऊन, प्रसन्न मनाने “अन्न हे पूर्ण ब्रम्ह” मानून लक्षपूर्वक अन्नग्रहण करावे.

• जेवणापूर्वी अर्धातास आधी व जेवनानंतर एक तास पाणी पिऊ नये. जेवणाच्या मध्ये गरजेनुसार एखादा दूसरा घोट पाणी-डाळीचा सार-वरण – भाताची पेज – पातळ भाजी आदि आहारीय द्रव घ्यावे. ज्यामुळे अन्नाचे पचन उत्तम होतो. जेवणाच्या शेवटच्या घास घेतल्यानंतर तोंडातील अन्न पोटात जाईल एवढेच एक-दोन घोट पाणी प्यावे. ज्यास्ती पाणी पिऊ नये.


• भूक नसताना बळजबरीने अन्न सेवन करू नये. परंतु काही गर्भिणीमध्ये पहिले 3-4 महीन्यात मळमळ-उलटी यासारखी लक्षणे असल्या कारणे भूकच लागत नाही. त्यामुळे या काळात वेळोवेळी वैद्यांच्या सल्लाने, औषधी बरोबर थोड्या थोड्या अंतराने थोडा थोडा आहार सेवन करावा.


• जेवताना भूक शिल्लक ठेऊन म्हणजे जेवानानंतर शरीर जड वाटणार नाही, हलकेच वाटेल एवढाच आहार सेवन करावा. जेवणापूर्वी अर्धा तास व जेवनानंतर एक तासाच्या आत झोपणे, शारीरिक किंवा मानसिक कष्ट देणारी कामे करू नये. जेवनानंतर अतिशय हलक्या पावलांनी शतपावली करावी. साधारण आराम मिळेल, अशा आराम खुर्ची मध्ये मोकळ्या हवेत बसावे. मनाला प्रसन्न करणार्‍या गोष्टी बोलाव्या. समाधानी व्हावे.


• आहार बनविण्यासाठी लोखंडाची, स्टीलची किंवा कल्हई केलेली पितळ – तांब्याची, मातीची भांडी वापरावी. जेवताना स्टीलची भांडी वापरावी. लोखंडाचा तवा-कढई-खलबत्ता-उलतने यांचा आवर्जून वापर करावा. प्रत्येक वेळी स्वछ करून वापरण्यास घ्यावी. जर्मल/जर्मन , प्लॅस्टिकची भांडी वापर शक्यतो टाळावा. उष्णतेशी याधातूंचा संपर्क आल्यास विशिष्ट विषारे निर्माण होतात. जी अनेक व्याधींचे कारण ठरतात.

काय खावे/खाऊ नये ?

• संपूर्ण गरोदरपणात साधारणता गोड, थोडेसे आंबट, थोडेसे मिठ असा आहार असावा. म्हणजेच तिखर, तुरट व कडू पदार्थ कमीत कमी खावेत.

Ayurveda Health Group - Join Free

• शरिरात उष्णता वाढेल असे पदार्थ खाऊ नयेत. आहारात साजुक व देशी गाईचे तूप असावे, जेवणाच्या पदार्थांमध्ये पातळ – द्रव पदार्थांचा समावेश असावा.

• आहार मनाला आवडणारा आणि पौष्टिक असावा..

• ज्वारीची भाकरी, जुने गहु, जुने साठे साळीचे तांदुळ, ताज्या पालेभाज्या ,ताज्या फळभाज्या (विशेषत: दुधी भोपळा), मुगडाळीच वरण आहारात असावे.
• दररोज साधारणतः मूठभरच मोड आलेली कडधान्ये विशेषतः मूग, मटकी आहारात समाविष्ठ असावी. मोड आलेली कडधान्ये वातुल असल्याने गर्भिणीच्या एका मूठभर पेक्षा ज्यास्त मोड आलेली कडधान्ये खाऊ नये.
द्रव पदार्थामध्ये गाईचे दुध, नुकतेच बनवलेले ताज्या दहयाचे घुसळून लोणी काढलेले ताजे गोडसर ताक, ताजे लोणी, खिर, लापशी, ताजी फळे , ओला नारळ नेहमी खाण्यात असावा • सुका मेवा – अंजीर, मनुका, जर्दाळू, बदाम, बेदाणे, चारोळे, साळीच्या लाह्या, खडीसाखर हे पदार्थ खावेत.
• शक्यतो मांसाहार करू नये.
• पदार्थ बनविण्यास लोखंडी कढईचा वापर शरिरात रक्ताचे प्रमाण व्यवस्थित राहण्यासाठी मदत करतो. रक्त वाढीसाठी पालक, मेथी, चाकवत,आंबट चुका, काळे मनुके, काळे खजूर, डाळींब, सफरचंद, आवळा इ. पदार्थ सेवन करावेत (खावेत).

• काळा गुळ, पारंपरिक पद्धतीने बनवलेले देशी गाईचे साजूक तुप,लाकडी घाण्याचे किंवा घाण्याचे शेंगदाणा/करडई तेल, जुने तांदुळ, देशी गाईचे दुध- लोणी यांचा आवर्जून वापर करवा.

• दूध – तूप आहारात घेण्याची सवय घेऊ शकत नसल्यास चपाती/ भाकरी बनवताना पीठ दुधात मळून त्यापासून बनवलेल्या भाकरी चपातीचा आहारात वापर करावा.
• शक्यतो एक वर्ष जुन्या धान्यांचा वापर आहारात करा. ते शक्य नसल्यास धान्ये भाजून घेऊन दळून पीठ करून वापरावी.
• ज्वारीची भाकरी, गव्हाची चपाती उत्तम. बाजरी गरम असल्याने बाजरी खाण्याची सवय नसणार्‍यांनी शक्यतो ती टाळावी.
• लाल माठ–राजगिरा-तांदुळसा या पालेभाज्या आवर्जून खाव्या. पालक – मेथी – चवळई यांचा ही समावेश करू शकता. दोडका-गोसावळे-शेवगा-दुधी भोपळा-भेंडी-वांगे-पडवळ आदि फळ भाज्या खाव्या. गाजर-बीट-काकडी-वाळूक यांचा आहारात समावेश करावा.

• डाळीमध्ये मुग सर्वात उत्तम. तिच भरपूर वापर करवा. मुग सोडून इतर कडधान्ये पचायला जड असतात, त्यामुळे चांगली शिजवून घेऊन थोडकीच 4 – 5 चमचे पर्यंतच ती ही भरपुर चाऊन खावी. मोड आलेली कडधान्ये पचायला अधिकच जड व वातुल होतात, त्यामुळे ती अधिक खाऊ नयेत.

• मनुका-आवळा-पेरु-अंजीर-डाळिंब-चिकु-संत्री- मोसंबी–उंबर-वेलची केळी या फळांचे सेवन अवर्जून करावे. लिंबु आहाराबरोबर जेवणात समाविष्ट असावे. आंबा व खजूर पहिले तीन महीने पुर्ण झाल्यानंतर आहारात समाविष्ठ करावा. बाकी सीझनल फळे थोड्या थोड्या प्रमाणात आहारात घेऊ शकता.

• सकाळचा चहा /कॉफी पुर्णता: टाळावी. सकाळची न्याहरी / नाष्टा हा थोडाच असावा परंतु भरपूर ताकत देणारा – सकस असावा, त्यात दह्यातून लोणी काढून घरगुती पद्धतीने बनवलेले साजूक तूपाचा आवर्जून समावेश असावा. याशिवाय दूध,लोणी,मनुका,तुपात भिजवलेले सुके अंजीर, गुळशेंगदाण्याचा लाडू, दुधात तांदूळ शिजवून बनवलेली खीर,नारळी भात, गुळ शेंगदाण्याची पोळी, तुप साखर चपाती, दूध भाकरी आदीचा यांचा आवर्जून वापर करावा.

आहारात कुठलाच पदार्थ आधिक मात्रेत नसावा. प्रमाणात खावे.

प्रामुख्याने अति तिखट – अधिक खारट- आधिक उष्ण – तीक्ष्ण- झाडून पोट साफ करणारे, आधिक प्रमाणात लघवी आणनारे पदार्थ पूर्णत: टाळावे. पपई-अननस – फणस – चीज – पनीर – खरवस पूर्णत:टाळावे. साबुदाणा-हिरवी मिरची-शेपूची भाजी- पॅकिंगचे ताक-चाट मसाले खाऊ नये. खजूर – आंबा हे पहिले तीन महीने पुर्णत : टाळावे.

• शक्य तो मांसाहार टाळणे उत्तम. परंतु खायचेच असतील तर अस्सल देशी व फिरून खाणार्‍या कोंबडीचे अंडे मांस-खावे. बॉयलर कोंबडीचे मांस-अंडी खाऊ नयेत.
• Iodine युक्त मीठ पुर्णपणे बंद करून सैंधव मिठाचाच वापर करणे. मीठचे आहारातील प्रमाण कमीच ठेवणे.
• कुकर मध्ये शिजवलेले अन्न पुर्णपणे टाळावे. तयार आटा/तयार पीठ हे चपाती-भाकरी-रोटीसाठी वापरू नका. सर्व प्रकारची तयार पीठे पुर्णपणे टाळावी.

• Preservativs टाकून ठेवलेले लोणची , मॅगी वगेरे पॅक पदार्थ , वेगवेगळे पॅकिंगचे ज्यूस, तयार लोणची आदि साठवणीतील सर्व पदार्थ टाळावे.

• थंड जल, शिळे व थंड अन्नपदार्थ, फ्रिज मध्ये ठेवलेल, मैदा व बेकरीचे पदार्थ, चीज – बटर युक्त पदार्थ, फास्ट फुड, मिठाचा अधिक वापर असलेले,मसालेदार,आंबविलेले,कुरकुरे वेफ़र्स आदि कोरडे (रुक्ष) पदार्थ- फरसाण आदि वातूल पदार्थ खाऊ नये, वडपाव भजी आदि बाहेरील तळलेले पदार्थ खाऊ नये. (चांगल्या तेलाचा वापर करून घरी तळून खाऊ शकता.)

• सर्व प्रकारचे उपवास कटाक्षाने टाळावे.
• घशाला येईपर्यंत (आकंठ) जेवण टाळावे. 5 व्या महिन्या नंतर पोटावरचा दाब वाढल्यावर जेवनानंतर साधारण अर्धा पाऊण तास पाठीला आधार देत पाय पसरून विश्रांति घ्यावी.

पिण्याचे पाणी :

सुवर्णसिद्ध जल: 4 कप पाणी एका लोखंडी भांड्यात घेणे. शुद्ध सोन्याची (सुवर्णधातूची) एक वस्तु त्यात टाकून पाणी ¼ th आटवणे. म्हणजे 1 कप होई पर्यन्त आटविणे. ते पाणी कोमट करून सकाळी उपाशीपोटी पिणे.
• इतर वेळी खाली वर्णलेल्या कोणत्याही एका प्रकारे जल सिद्ध करून प्यावे.

  • पिण्याचे पाणी हे लोखंडी भांड्यात 10 मिनिटे उकळून, गाळून गार झाल्यावर पिण्यास वापरावे. किंवा
  • गर्भिणीला मळमळ असताना मातीच्या काळ्या मटक्याचे खापर लाल होईपर्यंत तापवून ते पिण्याच्या पाण्यात विझवून तेच पाणी पिण्यास वापरावे.

  • एकदा उकळलेले/ सिद्ध केलेले / बनवलेले पाणी 8 तासानंतर पिण्यास वापरू नये. जर आठ तासांनी नवीन पाणी बनवून घेणे. तहानेनुसारच पाणी पिणे.

  • – पाणी पिण्यास प्लास्टिकची बाटली न वापरता स्टीलची बाटली/भांडी – काचेचे भांडे वापरावे.
    – पेल्याने तोंड लाऊन एक एक घोट पाणी पिणे सर्वात उत्तम. एका वेळी एका पेल्या पेक्षा ज्यास्त पाणी पिऊ नये.

  • याशिवाय खालीलप्रमाणे गर्भधारणेच्या महिन्यानुसार, आयुर्वेद ग्रंथात सांगितलेल्या मासानुमासिक औषधीचे, मासानुमासिक कल्प व सामान्य आहार आम्ही योजना करतो.

  • यासाठी देशी गाईचे दूध, देशी गाईचे साजूक तूप घ्यावे.. आयुर्वेदिय वैद्यकीय सल्याने पुढील योजना करावी.

  • १) पहिला महिना: सहज पचेन असा हलका व आवडीचा आहार असावा. प्रथम मास कल्प दिवसातून 2 वेळा दुधातून घ्यावा.

  • 2) दूसरा महिना – उकळून थंड केलेले दूध दिवसातुन 2 ते 3 वेळा एक एक कप प्यावे. द्वितीय मास कल्प दिवसातून दुधातून 2 वेळा घ्यावे.

  • 3) तिसरा महिना – सकाळी 2-3 वेळा दूध + तूप घ्यावे, तृतीय मास कल्प दिवसातून 2 वेळा दुधातून घ्यावे.

  • ४) चवथा महिना – १ चमचा ताजे लोणी + खडीसाखर असे दिवसातून 2 वेळा घ्यावे.
    चतुर्थ मास कल्प दिवसातून 2 वेळा दुधातून घ्यावा, जुने तांदूळ दुधात शिजवुन साखर टाकून दूध खीर आहारात घ्यावी.

  • ५) पाचवा महिना: दूध + ५-६ चमचे तूप रोजच्या आहारात असावे. पंचम मास कल्प व अनंता कल्प दुधातून घ्यावा.

  • ६) सहावा महिना: दूध + तूप + खडीसाखर दिवसातून 2-3 वेळा घ्यावे. षष्ठम मास कल्प व यष्टीकाश्मीरी कल्प दुधातून घ्यावा.

  • ७) सातवा महिना: दूध + तूप + खडीसाखर दिवसातून ३-४ वेळा घ्यावे. सप्तम मास कल्प व यष्टीकाश्मीरी कल्प दुधातून घ्यावा.

  • ८) आठवा महिना: दूध + तांदूळ यांची खीर दिवसातून 1 वेळा घ्यावी. अष्टम मास कल्प व दुधातून घ्यावा.

  • ९) नववा महिना – नेहमीचा सहज पचेल असा आहार दुध – तुप खडी साखर असा असावा. तूप भरपूर घ्यावे. नवम मास कल्प व दुधातून घ्यावा.

गर्भिणीचा विहार :

• गर्भिणीने आकाशी, पिवळ्या, गुलाबी अशी फिक्या रंगाची लुज कपडे घालावी. कानामध्ये कापसाचे बोळे ठेऊन, उबदार कपड़े वापरुन स्वतःला गरम ठेवावे. गडद रंगाची (विशेषत: लाल रंगाची), विचित्र नक्षीची, घट्ट कपडे घालू नये.

• ज्यास्तवेळ एकाच स्थितित बसणे / उभे राहणे, अधिक चालणे या गोष्ठी टाळाव्या. अवघड-लांबचा प्रवास करू नये.

• रात्री जागरण करू नये. रात्री 8 ते 9 तास व्यवस्थित झोप घ्यावी. दिवसा झोपु नये. अवघडेल अशा स्थितित, उंचवटा असलेल्या जागेवर झोपू नये. पायाखाली – पायामध्ये उशी घेऊन, पोटाला-पाठीला आधार देत झोपावे. कुशीवर झोपावे. सतत पाठीवर झोपू नये.


• अधिक बोलणे, जोरजोरात बोलणे, मोठमोठ्याने हसणे टाळावे, एकाची जागी अधिकवेळ बसणे, थंड- वाहता वारा, सूर्यसंताप (ऊन), शितजल यांचा संपर्क, वाहनप्रवास, धुळ- धुर प्रदूषण यांपासून दूर रहावे. सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळावे. अवघड – उंचवटा असलेल्या जागी बसू नये. उंचावरून खाली पाहू नये.

• अप्रिय ध्वनी, कर्कश आवाज, डी जे आदि धिंगाणा सॉन्ग, विचित्र संगीत ऐकू नये. गर्भिणीच्या मनाला आघात करणारी – दु:खी करणारी घटना सांगु नये. सांगणे गरजेचे असल्यास धीरदेऊन – तीच्या कलाने – मृदु करून सांगावी.

• कानाला सुमधुर वाटणारे – मनाल आनंद देणारे शांत संगीत ऐकावे.
• दिवसाची सुरवात गणेश प्रार्थना – अथर्वशीर्ष- विष्णुसहस्रनाम – प्रज्ञाविवर्धन स्तोत्र ऐकून करावी. तर सायंकाळी शुभंकरोती – रामरक्षा – हनुमान चालिसा यांचे सुमधुर स्वरातील गायन ऐकावे. इतर वेळी ओंकारची मंद धुन चालू ठेवावी.

• मनाला उद्विग्न, अस्वस्थ करणार्‍या गोष्टी ऐकू नये . पाहू नये. (न्यूज चॅनल – घरातील भांडंनाच्या मालिकापासून दूर राहावे).

• तेनाली रामन – उपनिषशद गंगा या शिकवण देणार्‍या मालिका, रामायण – श्रीकृष्ण – श्री गणेश , देवो के देव महादेव आदि आध्यात्मिक मालिका, सम्राट अशोक – चंद्रगुप्त मौर्य – शिवाजी महाराज – संभाजी महाराज – महाराणा प्रताप – पुण्यश्लोक अहिल्या आदि शौर्य कथांच्या इतिहासिक मालिका, कौटंबिक वातावरण हालकं फुलकं ठेवणार्‍या – नातं जपणार्‍या कौटुंबिक मालिका पाहाव्या. प्रेरणा व ज्ञान देणारी ऑडिओ बूक ऐकावी.

• बीभत्सा – घाणेरड्या गोष्टी दृष्टीत येऊ देऊ नये. नैसर्गिक सौन्दर्य – मनाला प्रसन्न करणार्‍या गोष्टी पहाव्या.

• अयोग्य व अतिव्यायाम करू नये. वैदयाच्या सल्याने हलके हलके व्यायाम करावे. श्रम – कष्टाची कामे श्रम करू नये.

गर्भधारणा झाल्यापासून प्रसुतीपर्यंतचा काळ व त्यापुढेही किमान 6 महीने ब्रम्हचार्या पालन करावी (मैथुन करू नये तसेच तत्सम विचारही कानी – मनी – ध्यानी नसावे).

• तंबाखु, सुपारी, पान, गुटखा, धूम्रपान , सिगार बिड़ी वगैरे, मद्यपान कुठलेही व्यसन करू नये. तसेच चहा – कॉफी यांनाही आवर घालावा.

• मल-मूत्र-अपान वायु-शिंक-कास-उल्टी-जांभई आदि नैसर्गिक वेग आडवू नये. तसेच बलपूर्वक यांचे धारणही करू नये. उदा. घशात बोट घालून उल्टी काढू नये, कुंथून मलप्रवृत्ति करू नये.

• मानसभाव- क्रोध-शोक-चिंता-संताप-मानसिक तानतनाव-भय-क्लेश-मत्सर – निंदा या गोष्ठी टाळाव्या. समाधानी रहावे. एकुनच सर्वप्रकारे मानसिक व शारीरिक विश्रांति घ्यावी.

• कुठल्याही प्रकारची धावपळ – दूरचा प्रवास करू नये.
• आमवस्या –ग्रहण – अशुभ दिनी घराच्या बाहेर पडू नये. लोकांच्या नजरेत ज्यास्ती येऊ नये.

सूर्यग्रहण / चंद्रग्रहनाच्या दिवशी घ्यायची काळजी विषयक माहितीपूर्ण लेखाची आमची लिंक खाली दिली आहे . आपण ती वाचून घ्यावी।

Garbhsaskar

थोडक्यात…

• संपूर्ण गरोदरपणात स्त्रीने मनाने आनंदी नेहमी खुश, व धार्मीक पूजा, पाठ, वाचन करावे. आसपास घडणारे अथवा T.V मालिकांती वाद-विवाद, भांडणतंय पाहू नये. चांगले पहावे, चांगले, ऐकावे, चांगले बोलावे.
प्रत्येक महिन्यांनुसार, गर्भाचे पोषण – तर्पन – धारण करणारे मासानुमासिक कल्प व इतर आयुर्वेदिक औषधी वैदयांच्या मार्गदर्शना खाली घ्यावेत. योग्य त्या तपासण्या करून वेळोवेळी वैदयांचा सल्ला घ्यावा. आयुर्वेद प्रती सम्पूर्ण विश्वासाने दिलेल्या सूचनांचे श्रद्धापूर्वक पालन करावे.

– Dr Shalaka S. Kadam
B.A.M.S. (आयुर्वेदाचार्य), C. C. Garbhsanskar.

–  Dr Saurabh B. Kadam
     M.D.(Ayurved), Pune
आयुर्वेद उपचार व पंचकर्म चिकित्सक

आप्तश्री आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक, दापोडी – पिंपळे गुरव रोड, शिवदत्त नगर, पिंपळे गुरव, पुणे 411061

Assistant Professor & Ayurved Consultant,
Dr D Y Patil College Of Ayurved & Research Center, Pune 411018

Contact no 9665010500/7387793189




Click here for sharing blog link on your social media

Comments

Leave a comment

Ayurveda Health Group - Join Free
error: Content is protected !!