Blog

     आत्मा आणि मन

   

Ayurveda Health Group - Join Free

Dr Saurabh B. Kadam
      M.D.(Ayurved), Pune

     आपल्या प्रत्येकाच्या शरीरात दोन गोष्टी आधिवास करीत असतात…,

       ”   आत्मा व मन   “
         आणि या दोघांच्या संयोगाने बुद्धि काम करते.

पूर्वी आत्मा-मन या गोष्टी आधुनिक शास्त्र मानत नव्हते ,परंतु आता काही प्रमाणात हे मान्य केले आहे . आयुर्वेदामध्ये याचे खुप सखोल व विस्तृत वर्णन केलेले आहे. आपल्या प्रत्येकाला या ज्ञानाची माहिती असायला हावी.

  पञ्चज्ञानेंन्द्रियांनी ( शब्द-स्पर्श-रूप-रस-गंध इंद्रियानी) ग्रहण केलेले जे काही ज्ञान-माहिती आहे, हे मनाद्वारे आत्म्याकड़े पोहोचविले जाते. बुद्धिच्या सहाय्याने व स्मृतिंच्या आधारे त्याच्यावर निर्णय होऊन, तो पुन्हा मनाकडे पाठवला जातो. त्यानंतर मन कर्मेंद्रियांना आदेश देते आणि कार्य घडते.

      आत्म्याचा गुण….   सत्व
      मनाचे दोष….. रज  आणि तम

         या नुसार आपण ज्या गुणाचे/दोषाचे पोषण करतो तो गुण/दोष वाढतो. आणि आत्मा-मन यांचा विकास होतो. जो गुण अधिक असेल, त्यानुसार आत्मा व मन यांचा कमी-अधिक विकास होतो. आत्मा आणि मन या मध्ये ज्याचा अधिक विकास होतो, म्हणजे जो अधिक प्रबल असतो, त्याच्या नुसार कार्य घडते.
        
        जर आत्मा प्रबल असेल तर आत्म्याने दिलेले निर्णय मन जसेच्या तसे आमलात आणते. मनाचे योग्यरित्य इंद्रियांवर नियंत्रण राहते. योग्य-अयोग्य, धर्म-अधर्म, सत्य-असत्य यांचे योग्य प्रकारे ज्ञान होते. आपली कर्तव्ये जबाबदारी इत्यादि गोष्टींचे उत्तम पालन आपल्यद्वारे होते .
      परंतु जर मन प्रबल असेल, तर मात्र रज किंवा तम यांच्या प्राबल्यनुसार मन इंद्रियाना परस्पर आदेश देते. आणि त्यानुसार कृती घडू लागतात.

          म्हणजे सत्व गुण वाढविणाऱ्या कृती केल्या …,

   जसे सात्विक आहार, स्वच्छता, सौम्य प्रेमळ भाषा, अहिंसा, स्वच्छ हवा पाणी, आध्यात्म, उत्तम संस्कार, अष्टांग योग, ध्यान इत्यादि मुळे सत्व गुण वाढतो. सत्व हा आत्म्याचा गुण असल्याने पर्यायाने आत्मा प्रबल होतो.

आणि जर आपण रज आणि तम गुण वाढवणाऱ्या कृति केल्या, तर मन प्रबल होते.

     जसे राजसिक गुण वर्धक कृति म्हणजे मध्यम आहार, व्यायाम, तसेच अहंकार, उत्साह, प्रयत्न, महत्वाकांक्षा, धाडसी – प्रेरणादायक -ध्येयासाठी कष्टाची तयारी- शिस्तबद्ध वातावरण किंवा त्याप्रमाणे संस्कार या गोष्टी राजसिक गुण वाढवतात. आणि मन राजस गुण प्रधान बनु लागते. आणि त्याप्रमाणे कार्य होऊ लागतात.

       तर तामसिक गुण वर्धक कृति म्हणजे, आति उष्ण, विदाह उत्पन्न करणारा (तिखट, अम्ल, खारट, शिळे अन्न), रुक्षता उत्पन्न करणारा, तसेच मांसाहार (जो हिंसक कृतितुन निर्माण झाला आहे ), विविध विरुद्ध अन्न एकत्र करून बनविलेले पदार्थ इत्यादि आहार, तसेच दूषित हवा- पाणी, अस्वच्छता त्याच बरोबर क्रोध-मत्सर-लोभ-स्वार्थी- हिंसक इत्यादिनी युक्त असे लोक, व्यसनाधिनता, व्यभिचार, चोरी-मारामारी आशा प्रकारच्या गोष्टी पाहणे-ऐकणे किंवा सभोवतालचे  वातावरण असे असणे यामुळे तम गुण वाढतो. आणि मन तामसिक बनु लागते.

         येथे मनाचे कार्य खुप महत्वाचे असते, कारण इंद्रियांनी ग्रहण केले जे काही ज्ञान आहे, त्यातील कोणते ज्ञान-माहिती स्वतः ग्रहणकरून आत्म्याकडे पोहोचवायचे व कोणते नाही पोहोचवायचे? हे मन ठरवते. उदा. एकाच वेळी आपण बऱ्याच गोष्टी ऐकत असतो, पण आपले लक्ष्य ज्यावर आहे त्याच गोष्टीचे ज्ञान आपल्याला व्यवस्थित होते. काय पहायचे-काय नाही पहायचे?, काय ऐकायचे -काय नाही ऐकायचे ? इत्यादि मनावर औलंबुन असते .

      मनाच्या या वैशिष्ठयामुळेच एकाच वातावरणात वाढलेल्या  दोन व्यक्तींचे विचार-कार्य यात भिन्नता असते. कारण जरी ते एकाच वातावरणात राहिले असले तरी, त्यांच्या मनाने मात्र ज्ञानेंद्रियांकडून वेगवेगळे ज्ञान-माहिती ग्रहण केलेली असते. आणि त्यानुसार त्या त्या गुणांचा विकास होतो .

Ayurveda Health Group - Join Free

      तसेच आत्म्याचा कुठला निर्णय आमलात आणायचा व कोणता नाही ? हे ही मन ठरवते . काही वेळा तर काही निर्णय मनच घेते. कुठला ही विचार-चिंतन न होताच आपल्याकडून एखादे कार्य केले जाते. उदा. हाताला चुकून काही टोचले किंवा पोळले तर स्पर्शेन्द्रियाकडून (त्वचेकडून) आलेल्या महितीवर मन लगेच कार्य करते आणि पटकन आपण हात मागे घेतो. त्यानंतर झालेल्या घटनेची माहिती आत्म्याला दिली जाते .

      आत्म्याला “ज्ञाता” असे म्हंटले जाते. कारण योग्य-अयोग्याचे संपुर्ण ज्ञान आत्म्याला असते. आत्म्याला  ज्ञानाचे ग्रहण मनाबरोबरच ब्रम्हरन्धाद्वारेही होते, असे शास्त्र सांगते.

      आपल्याद्वारे स्वतःचे किंवा इतरांचे जे सत्व-रज-तम या गुणांचे पोषण केले जाते, यालाच “संस्कार”असे म्हणतात. संस्कारासाठी वयाची पहिली आठ ते दहा वर्षे खुप महत्वाची असतात. कारण याच काळात मन आणि बुद्धिचा विकास सर्वाधिक होतो.

      जसा सभोवतालच्या वातावरणात घडणाऱ्या प्रत्येक कृतीचा परिणाम सत्व-रज-तम या गुणांमार्फत तुमच्यावर होतो, तसाच तुम्ही केलेल्या प्रत्येक कृत्याचा परिणाम सभोतालच्या वातावरनावर तर होतोच, शिवाय तुमच्या स्वतः वर देखिल होतो.

      थोर संत लोक सांगायचे की ,” जसे कर्म कराल,तसे फळ मिळते.” हे काय खोटे नाही !

कारण तुमच्या प्रत्येक कृत्याचा परिणाम सत्व-रज-तम या गुणांनद्वारे तुमच्या व इतरांच्या आत्मा व मन या दोघांवर होतो, आणि त्या परिणामानुसार पुढे भविष्यात, तुमच्याकडून व इतरांकडून कृत्य घडते .त्याचा परिणाम घडून तुम्हाला त्याचे फळ मिळते.
     
कर्म जर सात्विक असेल, प्रामाणिक असेल, धर्मानुसार (म्हणजे त्यावेळच्या परस्थितिनुसार तुमच्या कर्तव्याला धरून) असेल, तर फळ हे चांगलेच सुखदायक असणार, आणि जर कर्म तामसिक ,अधर्माला अनुसरुन असेल तर फळ हे वाइट दुःखदायक, कष्टदायकच असणार…!

जे कर्म असेल ते मन करतं, 
आणि सुख: दुःख मात्र आत्म्याला होतो…!!

मनाला हव ते करू देऊ नका. विवेक बुद्धिच्या साह्याने स्वत:चा (आत्म्याचा) आणि शरीराचा विचार करा, आणि नंतर कर्म करा.

शारीर = रथ, जो की महारथ्याची (आत्म्याची) मालमत्ता आहे.

मन = रथाचा सारथी म्हणजे महारथ्याचा  सेवक आहे.

आत्मा = रथामध्ये स्वार महारथी

इंद्रिये (ज्ञानेंद्रिय व कर्मेंद्रिय)= रथाचे अश्व ज्यांची लगाम सारथ्याच्या (मन) हातात आहे.

हा सारथी(मन) महारथ्याच्या (आत्म्याच्या) आज्ञेने चालतो. म्हणजे निर्णय महारथी (आत्मा) घेतो आणि कार्य स्वरूपात आणने हे सेवक (मन) इंद्रियांच्या साह्याने करतो.

पण कधी कधी या सेवकामध्ये अहंभाव निर्माण होतो. क्षणिक सुखामागे हे मन धावते. इंद्रियांच्या विषयांमध्ये गुंतले जाते. आणि मग तो महारथ्याची आज्ञा मानत नाही आणि रथ कसा ही चालवतो. परिणामी रथाचे आणि रथचे नुकसान होते. म्हणजे महारथ्याच्या मालमत्तेचे नुकसान होते. मग महारथी आणि सेवक यांच्यातला समन्वय बिघडतो.

मग यांच्यात (मन-आत्मा यांच्यात) समन्वय साधन्यासाठी आणि मोडलेला रथ दुरुस्त करण्यासाठी (शरीराचे आजार बरे करण्यासाठी) लोकांना 
“वैद्याकडे” याव लागतं.

म्हणून आत्म्याने आधी पासूनच मनावर नियंत्रण ठेवावे !
म्हणजे पुढे स्वत:ला (आत्म्याला) त्रास होणार नाही.  Dr Saurabh B. Kadam

      M.D.(Ayurved), Pune

आयुर्वेद उपचार व पंचकर्म चिकित्सक,
आप्तश्री आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिक, 
दापोडी – पिंपळे गुरव रोड, शिवदत्त नगर, पिंपळे गुरव, पुणे 411061
Contact no 9665010500

🪀https://wa.me/919665010500?text=aaptashriayurved.in

Ayurved Consultant & Assistant Professor at, Dr D Y Patil College Of Ayurved & Research Center, Pune 411018

आयुर्वेद जाणुन घेण्यासाठी व असेच अनेक आरोग्यविषयक माहितीपर लेख वाचनासाठी आमची Website व  Blog ला जरूर भेट द्या…

https://shriayurvedic.in



Click here for sharing blog link on your social media

Leave a comment

Ayurveda Health Group - Join Free
error: Content is protected !!